धान पिकांचे नुकसान; शेतकरी सापडले संकटात
वडधाः आरमोरी तालुक्यात गेलेला जंगली हत्तींचा कळप पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाला असून शनिवारी कळपाने कुहाडी शेतशिवारात हैदोस घालत दिभना परिसरात एन्ट्री केली आहे. वर्षभरात दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्हा मुख्यालयानजीक हत्तींचा कळप दाखल झाल्याने वनविभागासह शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
गडचिरोली तालुक्यांतर्गत येणाऱ्या कुऱ्हाडी येथील प्रतिष्ठित शेतकरी जितेंद्र मुनघाटे यांच्या शेतात हत्तींनी रात्रभर धुडगूस घातला. सध्या जवळपास सर्वच
धानपीक कापणीला आले आहेत. याच परिसरात काही शेतकऱ्यांनी खरिपातील धान पिकाची कापणी केली आहे. याच कालावधीत हत्तींनी धुडगूस घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेले धानपीक हत्तींकडून पायदळी तुडवले जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, हत्तीच्या कळपाने मागील काही दिवसांपासून ज्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होऊन त्याच मार्गाने पुन्हा परत आरमोरी तालुक्यात प्रवेश केला होता.
वनविभागाचे कर्मचारी सुस्त
हत्तींनी पिकांचे नुकसान केल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी संबंधित वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, वन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्तींकडून नुकसान होत असतानाही या वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी केवळ शेतकऱ्यांना सूचना करताना दिसून येत आहेत. मात्र हत्तींचा बंदोबस्त करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या व्यक्तीने जंगलात जाऊन सरपण आणल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान झाल्यास तत्काळ कारवाई केली जात नाही, हा दुजाभाव नाही का? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पोर्ला वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी याबाबतीत सुस्त असल्याचे दिसून येते.
धानोरा: चामोर्शी मुतनूर तालुक्यातील पर्यटनस्थळावजळ आबापूर येथे शशीकांत सतरे नामक युवक मजुराचा बळी घेतल्यानंतर टस्कर हत्ती धानोरा तालुक्यातील मेंढा लेखा जंगली परिसरात शुक्रवारी दाखल झाला असून अनेकांना दर्शन दिले आहे. टस्कर हत्ती आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून जंगली टस्कर हत्ती आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व आता धानोरा तालुक्यात येरझरा मारत आहे.
.
गडचिरोली तालुक्यातील चांदाळा जंगल परिसरातून चामोर्शी तालुक्यातील मुतनूर पर्यटनस्थळाजवळील आबापूर जंगल परिसरात असलेल्या टस्कर हत्तीने चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव भुजला येथील शशीकांत सतरे या युवकाचा बळी घेतला होता. त्यानंतर हा हत्ती शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील मेंढा लेखा जंगल परिसरात आढळल्याची माहिती आहे. टस्कर हत्तीने अनेकांना दर्शन दिले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील धान कापणी व धान बांधणीचा हंगाम जोरात सुरू असून बहुसंख्य महिला व पुरुष मजूर शेतात असतात. शेत परिसर जंगलाला लागून असल्याने व टस्कर हत्तीचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने टस्कर हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्रातील मौजा रामाळा येथे "वन्यजीव सप्ताह " निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली. दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोंबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो त्या दरम्यान वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वन्यजीवांविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येतो. सदर सप्ताहाचे औचित्य साधून आरमोरी पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा रामाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामाळा व वनपरिक्षेत्र आरमोरी यांच्या वतीने रॅली काढून गावांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला, आरमोरी उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री.फुलझेले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री . मडावी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती श्री.खुशाल नैताम, शिक्षीका सौ.पिलारे मॅडम, माकडे मॅडम, वनरक्षक अजय उरकुडे,पी.आर.पाटील, आनंद साखरे,कु.डोंगरे मॅडम, वनमजूर किर्ती मेश्राम, होणाजी कुथे, मोरेश्वर बोरूले, वाहन चालक सुनील उरकुडे व विद्यार्थी उपस्थित होते.